अबब…लाचखोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल याच्याकडे 25 लाखाची रोकड

0
276

मुंबई, दि. 24 (पीसीबी): परभणी येथील सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला आहे. अपघात प्रकरणात दोन कोटी रुपयांची लाच मागून तडजोडीत दीड कोटी रुपये घेण्याचे पाल याने कबूल केले होते. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका पोलीस कर्मचाऱ्याला 10 लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर राजेंद्र पाल याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये लाखो रुपयांची रोकड आणि महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत.

लाचखोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल याच्यावर एसीबीने कारवाई केली. यानंतर त्याच्या मुंबईतील फ्लॅटची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्या घरातून तब्बल 24 लाख 84 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

2 कोटी लाचेची मागणी करुन 10 लाखाचा पहिला हप्ता घेताना पाल व त्याच्या ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी (दि.23) परभणीतील सेलू विभागाचे उपविभागीय पोलीस कार्यालयात अटक केली. पाल याची अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली आहे. पाल पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी वडाळा रेल्वे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक होता.

राजेंद्र पाल याचे कुटुंब मुंबईत राहत असून पाल याच्यावर कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने आज (शनिवार) सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाल याच्या घरात 24.84 लाख रुपये मिळाले. तसेच बँकेची पासबुके व इतर मालमत्तेची दस्तऐवज जप्त केली. त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.