पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, उज्ज्वल निकमांचंही काम सुरु – अनिल देशमुख

0
360

मुंबई,दि.१०(पीसीबी) – “वर्ध्यातील पीडित मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण ती वाचू शकली नाही याचं दु:ख आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे संबंधित घटनेबाबत पोलिसांच्या संपर्कात आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी ही राज्य सरकारची भूमिका आहे” अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांना दिली.

हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज सकाळी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. शिवाय पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची ग्वाहीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, हिंगणघाट येथील पीडित प्राध्यापिकेचं निधन ही अतिशय दु:खद घटना आहे. आमच्या परीने तिला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पीडीत तरुणीला वाचवू शकलो नाही याचं दु:ख आहे. आज सकाळीच पीडितेच्या वडिलांशी बोललो, त्यांच्या घरातील मुलीच्या भावाला सरकारी नोकरी देणार आहोत. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी उज्ज्वल निकम कामाला लागले आहेत. सकाळपासून उज्ज्वल निकम, जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललो. एक-दोन दिवसांत त्यांची बैठक आहे.

दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेनं सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे.