‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास खळ्ळ-खट्यॅक; मनसेचा इशारा

0
663

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – अभिनेते विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा    चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.  तर या चित्रपटाच्या प्रदर्शनास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने हरकत घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन  सत्ताधारी पक्षच  करणार नसेल, तर  हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळ-खट्यॅक करावे लागेल, असा इशारा संघटनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत  ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित  झाला आहे.  निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस व डीएमकेने केली होती. आता मनसेनेही या मुद्द्यावरुन  इशारा दिला आहे.

या सिनेमातील गाणी ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिल्याचे  सिनेमाच्या अधिकृत पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे.  प्रत्यक्षात मात्र, जावेद अख्तर आणि समीर या दोघांनीही या सिनेमासाठी गीतलेखन केलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील या चित्रपटावर  हरकत घेतली आहे.