पीएमआरडीएकडून पुढील ५० वर्षांचे नियोजन, प्राधिकरणाचे पीएमआरडीएत विलीनीकरण अशक्य – किरण गित्ते

0
785

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अंतर्गत असलेल्या सुमारे ७ हजार २५७ चौरस किलोमीटरच्या परिसरात नागरी सुविधा पुरवताना तसेच विविध प्रकल्प राबविताना भविष्यातील ५० वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारी (दि. २३) दिली.

गित्ते यांनी पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीएच्या भविष्यातील नियोजनाबाबत माहिती दिली.

किरण गित्ते म्हणाले, “पीएमआरडीच्या हद्दीत भविष्यात कोण कोणते प्रकल्प राबविले कोणते प्रश्न निर्माण होतील आणि  शहराला ते सोसवेल का? याबाबत विकास आराखडा करण्याचे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यासंदर्भात एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा २७ नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे. पीएमआरडीए फक्त महानगरांचे दीर्घकालीन योजनांचे विकास आराखडे तयार करण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर काही पायाभूत सुविधा उभे करण्याचे कामही करणार आहे. ही संस्था नियोजन व विकास या दोन तत्त्वांवर उभारण्यात आली आहे. जवळपास सात हजार २५७ चौरस किलोमीटर परिसरात पीएमआरडीए विकासाचे नियोजन करणार आहे. भारतात सर्वात मोठे क्षेत्र असलेले हे प्राधिकरण आहे. जवळपास ४० ते ५० वर्षांचा मास्टर प्लॅन करण्यात येत असून यासाठी सिंगापूर सरकारची सर्बना जुरोंगया या कंपनीची मदत घेतली जात आहे. या कंपनीला जगभरातील १४० महानगरांचा नियोजनाचा अनुभव आहे.

पीएमआरडीएला देण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये आजमितीला ८५ लाख लोकसंख्या आहे. भविष्यातील दोन कोटी लोकसंख्या अपेक्षित ठेवून विकास आराखडा केला जात आहे. येथे येणाऱ्या लोकांना रोजगार, त्यांना राहण्यासाठी जागा, शिक्षण, आरोग्य, पाणी यांसारख्या सुविधांचा विचार केला जाणार आहे. मेट्रो लाईट, मेट्रो मोनोरेल याचबरोबर पुणे ते लोणावळा सबर्बन रेल्वे याचाही विचार करण्यात आला आहे. पीएमआरडीएकडे पाण्याच्या नियोजनाचेही काम देण्यात आले आहे. आपल्या जवळपासच्या धरणांमध्ये ९९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यातील ३० टीएमसी पाणी पिण्यासाठी वापरले जाते. ३३ टीएमसी पाणी शेतीसाठी वापरले जाते. उर्वरित पाणी उद्योग व गळतीमध्ये जात आहे. या संपूर्ण पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भात मास्टर प्लान तयार करण्याचे काम चालू आहे. लवकरच त्याचा आराखडा लोकांसमोर मांडणार आहोत. पीएमआरडीएमार्फत छोट्या छोट्या भागांचाही विकास आराखडे तयार करून तेथील विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. हिंजवडी-वाकड-नाशिक फाटा-चाकण असा मेट्रो मार्ग करण्याचा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात विलिनीकरण सध्यातरी अशक्य आहे. प्राधिकरणावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांच्याकडून अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सध्यातरी हे विलीनीकरण शक्य वाटत नाही. अनधिकृत बांधकामे रोखलीच पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.”