पिक्चर अजून बाकी आहे; राहुल गांधींचा मोदींना टोला

673

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या चोरीची कबुली दिली आहे. मात्र, पिक्चर अजून बाकी आहे,’ असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना लगावला. राफेल  खरेदी व्यवहाराची संपूर्ण माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.

राफेल खरेदी व्यवहारात घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर व हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने सरकारला राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सोमवारी त्याबाबतची माहिती  आणि राफेल विमानांच्या किंमतीची माहिती बंद लिफाफ्यात देण्यात आली.

यानंतर राहुल यांनी आज (मंगळवार) ट्विट केले आहे. ‘हवाई दलाला विश्वासात न घेताच सरकारने राफेलसाठी नवा करार केला. तसेच ३० हजार कोटी अंबानींच्या खिशात घातले, असे  सरकारने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात  म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.