पिंपळे गुरव, पिंपळे सौदागार येथे ‘व्हिलेज प्लाझा’, ‘क्रीडा संकुल’ प्रकल्पास मंजुरी

0
512

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गंत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागार या ‘एरिया बेस डेव्हलपमेंट’ भागामध्ये ‘व्हिलेज प्लाझा’ आणि ‘अनेक सुविधायुक्त क्रीडा संकुल’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्प अहवालास मान्यता देऊन निविदा काढण्यास आज (शुक्रवार) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाची आठवी बैठक आज महापालिकेत झाली. ही बैठक  नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी ममता बात्रा, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन चिखले, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी पी. एस. खांडकेकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

पिंपळे गुरव येथील ‘व्हिलेज प्लाझा’ या प्रकल्पासाठी ४८ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. तर पिंपळे सौदागर येथे अनेक सुविधायुक्त क्रीडा संकुल प्रकल्प उभारण्यासाठी ३४ कोटींच्या खर्चास मंजुरी दे्ण्यात आली आहे. हे दोन्ही प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) राबविण्यात येणार आहेत.