पिंपळे गुरवमध्ये भरधाव कारच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

0
634

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका सहा वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.३१) दुपारी तीनच्या सुमारास पिंपळे गुरव येथील रामनगर परिसरात घडली.

लावण्या सचिन कडलग (वय ६, रा. रुतुजा हाइटस, रामनगर, पिंपळे गुरव) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल सचिन सुभाष कडलग (वय ३४) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप खंडू शिंदे (वय ३१ रा. ज्ञानेश पार्क, पिंपळे गुरव) या कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास सहा वर्षीय चिमुकली लावण्या ही पिंपळे गुरव रामनगर येथील दत्तात्रय देशमुख यांच्या घरासमोर खेळत होती. यावेळी आरोपी कारचालक दिलीप शिंदे याने त्याच्या ताब्यातील कार (क्र.एमएच/१२/एचएन/२३३३) भरधाव वेगाने आणून लावण्याला जोरदार धडक दिली. या घटनेत लावण्या गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी कारचालक दिलीप शिंदे विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.