पिंपरी – चिंचवड शहरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त, महागाईच्या काळात इंधनाची नासाडी

0
346

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पावसाच्या संततधारेने आधीच स्मार्ट सिटी खड्ड्यात गेली आहे. अनेक चौकांभोवती असलेला अतिक्रमणाचा विळखा आणि अवैध पार्कींगमुळे वाहुतक कोंडीत भरच पडत आहे. त्यातच, वाहतूक बेटाची असलेली अकारण रुंदी अन् वाहतूक सिग्नलवर कमी – अधिक वेळांमुळे विविध ठिकाणी वाहतूक तुंबून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यामुळे ऐन मोक्याच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून वाहनचालकांना दररोज हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात वेळेचा अपव्यय तर होतोच, याशिवाय महागाईच्या काळात इंधनाची नासाडी होऊन आर्थिक झळही वाहनचालकांना सोसावी लागत आहे.

पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध चौकातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. वाहतुकीची सर्वाधिक वर्दळ असलेले जुना पुणे – मुंबई महामार्ग, देहूरोड – कात्रज बाह्यवळण मार्ग, नाशिक फाटा ते मोशी मार्ग हे दिवसरात्र वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहेत. नाशिक फाटा, भोसरी – आळंदी रोड, गणेश साम्राज्य चौक, इंद्रायणीनगर चौक, दिघी मॅगझिन, मोशी चौक, चिंचवड – केएसबी चौक, चापेकर चौक, डांगे चौक, भुमकर चौक, वाकड, जगताप डेअरी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, शगुन चौक हे चौक अपघाताचे आणि वाहतुक कोंडीचे केंद्रबिंदू बनले आहेत. अशीच स्थिती देहूरोड – तळेगाव मार्ग, स्पाईन रस्त्याची आहे.
या चौकांमध्ये सातत्याने अपघात घडतात. काही चौकांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचे स्टॉल असल्यामुळे सतत वाहनांची वर्दळ असते. रस्त्यालगत चौकाभोवती चारचाकी, दुचाकी सर्रासपणे उभ्या केलेल्या दिसून येतात. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आतापर्यंत शेकडो उपाययोजना राबविण्यात आल्या. साऱ्या अपयशी ठरल्या आहेत. या संदर्भात वाहतूक पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विविध प्रस्ताव देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू केल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकते, असे प्रस्तावात नमूद केले आहे. परंतु, अद्यापपर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

सर्वाधिक वाहतूक कोंडी व वाहनचालकांना त्रासदायक ठरणारे शहरातील केंद्र म्हणजे पिंपरी कँम्प. या ठिकाणची कोंडी नित्याचीच. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक एकेरी केल्यानंतरही समस्या सुटलेली नाही. रहदारीच्या वेळी साधारण १५ ते २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय आणि इंधनाची नासाडीही होते. मोठी वाहने कोंडीत सापडली तर समस्या आणखी गंभीर होते. त्यामुळे वाहनचालकांना दररोज हकनाक आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

चाकण परिसरातून येणारी जड वाहने आणि तळवडे आयटी पार्वâमधील बेशिस्त वाहनांमुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास तळवडे येथील रस्त्यांवरून ये-जा करणे वाहनचालकांसह नागरिकांना डोकेदुखी ठरते. त्यामुळे ट्रक, कंटेनरबरोबरच तळवडे आयटी पार्कमधील असंख्य बस व अन्य वाहने लवकर पोहोचण्यासाठी तळवडे रस्त्यावरून बेशिस्तपणे ये-जा करतात. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी आयटी पार्कच्या वाहनांमुळे तळवडे येथील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सोनवणे चौक, गणेशनगर, तळवडे गावठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. ही वाहतूक कोंडी तळवडे भागापासून तर निगडी सिग्नलपर्यंत जाणवते. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस या ठिकाणची वाहतूक नियंत्रित करतात. मात्र, अनेक जण लवकर जाण्यासाठी विरुद्ध दिशेने येतात. या ठिकाणी काही भागातला रस्ता अरुंद आहे, तर काही ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा बोजवारा उडतो.

पिंपरी – चिंचवड शहरातील प्रशस्त अन् सुंदर रस्त्यांची भुरळ अनेकांना नसेल तर नवल. स्मार्ट सिटीत रस्ते प्रशस्त झाले खरे, परंतु, अवैध पार्कींगमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीच्या विळख्यात स्मार्ट रस्ते सापडले आहेत. विविध ठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्तीवर असतात. परंतु, वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी त्यांचे लक्ष ‘टार्गेट’ पूर्ण करण्यावरच अधिक असते. काही सिग्नल यंत्रणांच्या वेळेमध्ये तफावत आहे. ३० सेकंदापासून ते दोन मिनिटांपर्यंत सिग्नलच्या वेळा निश्चित केलेल्या असल्या तरी यात अनेक ठिकाणी तफावत आहे. तर, काही ठिकाणी बेशिस्त वाहनचालक सिग्नलला जुमानत नाहीत. परिणामी, सिग्नल कोलमडून वाहतुकीची कोंडी होते. तर, काही सिग्नलवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण असतो. अशावेळी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर केला तर सिग्नलवरचा ताण कमी होऊन वाहतूक नियमांचे पालन केल्यास कोंडीची समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.