पिंपरी-चिंचवडला तीन धरणातून पाणी आणण्यासाठी सत्ताधारी भाजप गतिमान; जलसंपदा खात्याला पहिल्या टप्प्यात ४५ कोटी देणार

1845

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना, आंद्रा आणि भामा-आसखेड या तीन धरणातील सुमारे १४९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा कोटा मंजूर झाला आहे. हे आरक्षित पाणी शहरात आणण्यासाठी सत्ताधारी भाजपने हालचाली गतिमान केल्या आहेत. या पाण्याच्या मोबदल्यात सिंचन पुनर्स्थापना आणि पुनर्वसन खर्चापोटी राज्य सरकारला तातडीने ४५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. अर्थसंकल्पात शहराच्या अन्य विकासकामांसाठी तरतूद रक्कमेतून ४५ कोटी रुपये वर्गीकरणास सर्वसाधारण सभेत बुधवारी (दि. ३१) मंजुरी देण्यात आली. ही रक्कम तातडीने जलसंपदा खात्याकडे जमा करून पवना, आंद्रा आणि भामा-आसखेड या तीन धरणातील शहरासाठी आरक्षित पाणी आणण्याची कार्यवाही गतीने करण्याची प्रशासनाला सूचना करण्यात आल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून टप्पा क्रमांक ४ अंतर्गत ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातील ३८.८७ दशलक्ष घनमीटर आणि खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणांतील ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला होता. या पाण्याचा उपसा करण्याच्या मोबदल्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी २३६ कोटी पुनर्वसन खर्चापोटी ७० कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे एकरकमी जमा करणे बंधनकारक होते. त्यासाठी मुदतही देण्यात आली होती. परंतु, एवढी मोठी रक्कम एकरकमी भरणे शक्य नसल्याने महापालिकेने मुदतीत हे पैसे भरले नाहीत.

त्यामुळे जलसंपदा खात्याने पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना, आंद्रा आणि भामा-आसखेड या तीन धरणातून मंजूर पाण्याचा अतिरिक्त कोटा रद्द केला होता. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेऊन शहरासाठी मंजूर पाण्याचा कोटा रद्द न करण्याची मागणी केली होती. तसेच सिंचन पुनर्स्थापना आणि पुनर्वसनाचा खर्च टप्प्याटप्प्याने जमा करण्याची महापालिकेला मुभा द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने पिंपरी-चिंचवडसाठी तीनही धरणातील सुमारे १४९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा अतिरिक्त कोटा मंजूर केला.

सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असल्यामुळे पवना, आंद्रा आणि भामा-आसखेड या तीनही धरणातून शहरासाठी अतिरिक्त पाणी आणण्यासाठी गतीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजपने या तीनही धरणातील पाणी उचलण्याच्या मोबदल्यात जलसंपदा खात्याला तातडीने ४५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ४५ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरासाठी अतिरिक्त पाणी आणण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. हे पाणी शक्य तितक्या लवकर आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी यापुढील काळात प्रशासन गतीमान करण्यात येईल, असे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.