पिंपरी-चिंचवडमध्ये विक्रीसाठी आणलेले ९ पिस्टल आणि १३ जिवंत काडतुसे जप्त; आरोपींमध्ये उच्चशिक्षितांचा समावेश

0
2975

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा व खंडणीविरोधी पथकाने वाकड येथे एका उच्चशिक्षित गुन्हेगारांसह पाच जणांकडून तब्बल ९ पिस्टल आणि १३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही सर्व पिस्टल विक्रीसाठी आणण्यात आले होते. या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल सूर्यभान लेंडवे (वय ३०, रा. गंधर्वनगरी, भोसरी), अक्षय ऊर्फ सागर अरूण टिळेकर (वय २२, रा. दौंड), तुषार राजाराम सोंडकर (वय २८, रा. भोर), सुनील ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २५, रा. हवेली) आणि सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३१, रा. रायगड) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

यासंदर्भात अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरोडा व खंडणीविरोधी पथकातील कर्मचारी आशिष बोटके यांना एक तरूण वाकड येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकातील पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर वाकडमध्ये सापळा रचला. अमोल लेंडवे हा तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्याकडे एक पिस्टल आढळले.

त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून पिस्टल विक्री करणाऱ्या एजंटची माहिती मिळाली. त्याच्या आधारे अक्षय टिळेकर, तुषार सोंडकर, सुनील वाघमारे, सोमनाथ चव्हाण या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. या पाचही जणांकडून एकूण ९ पिस्टल, १३ जिवंत काडतुसे, एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ७ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे रानडे यांनी सांगितले.

दरोडा व खंडणीविरोधी पथकातील पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरूषोत्तम चाटे, अजय भोसले, अशोक दुधावणे, गणेश हजारे, महेश खांडे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, उमेश पुलगम, शरीफ मुलाणी, किरण खांडेकर, निशांत काळे, किरण काटकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, आशिष बनकर, प्रवीण माने, सुधीर डोळस, नितीन खेसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.