पिंपरी चिंचवडमधील पुरग्रस्तांना शासनातर्फे १५ हजारांची मदत

0
762

आकुर्डी, दि. १० (पीसीबी) – पावसाचे पाणी घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पुरग्रस्त बाधितांना पंधरा हजार रूपयाचा धनादेश, प्रत्येकी दहा किलो गहू व तांदुळाचे वाटप अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या वतीने आमदार व खासदारांच्या हस्ते आज करण्यात आले.

मदतनिधी वाटपाचा पुणे जिल्हयातील पहिला कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये घेण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, आमदार लक्ष्मण जगताप, यांच्या हस्ते या मदतनिधीचे व साहित्य वाटप झाले. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, अप्पर तहसिलदार सुरेश काळे, तहसिलदार गीता गायकवाड, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल, दापोडी, सांगवी, चिंचवडगाव, संजय गांधीनगर, आंबेडकर, बौद्धनगर भागातील ५४३ घरांचे पंचनामे तहसिलदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. पुणे जिल्हयासाठी तातडीने पुनर्वसन मदतनिधी म्हणून ५० कोटी वितरित केले असून त्यापैकी पिंपरी चिंचवडसाठी १ कोटी २५ लाख रुपये रक्कम आली आहे. आज प्रतिनिधीक स्वरूपात ५० कुटुंबांना मदतनिधी व गहू, तांदुळ वाटप करण्यात आले.