पिंपरीत घरकाम करणाऱ्या महिलांनी ३० लाखांचे दागिने केले लंपास

0
681

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – घरकाम करणाऱ्या दोघा महिलांनी एका वृध्द महिलेच्या घरातून तब्बल ३० लाख ७५ हजारांचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरीतील मासुळकर कॉलनीजवळील टेल्को कॉलनीमध्ये घडली.

याप्रकरणी राजीव अशोक रोषा (वय ४५, रा. टेल्को कॉलनी, मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोनम संतोष कटारे (वय २९, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) आणि प्राजक्ता उर्फ प्रज्ञा संजय लोंढे (वय ३०, रा. यशवंतनगर, पिंपरी) या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृध्द विना रोषा (वय ७४) या टेल्को कॉलनीत राहतात. आरोपी सोनम कटारे आणि प्राजक्ता लोंढे या दोघी विना रोषा यांच्याकडे घरकाम करतात. सोनम कटारे स्वयंपाक तर प्राजक्ता साफसफाईचे काम करते. विना रोषा सोमवारी (दि. ५) एका सोहळ्यानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तेथून परत आल्यानंतर त्यांनी घरातील कपाटात त्यांचे हिऱ्यांचे व सोन्याचे दागिने ठेवले होते. मंगळवारी (दि. ६) सकाळी नऊच्या दरम्यान आरोपी सोनम कटारे स्वयंपाक करण्यासाठी आली. दुपारी बाराच्या सुमारास ती स्वयंपाक करून गेली. त्यानंतर साफसफाई करण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास प्राजक्ता आली.

त्यावेळी विना रोषा यांच्या घरातील नळाची दुरुस्ती करण्यासाठी प्लंबर आला होता. त्याने नळ दुरुस्ती केल्याने त्याला पैसे देण्यासाठी विना रोषा यांनी कपाट उघडले असता, कपाटातील तब्बल ३० लाख ७५ हजारांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत रोषा यांनी त्यांच्या मुलगा राजीव या घटनेबद्दल सांगितले. राजीव यांच्या फिर्यादीनुसार घरकाम करणाऱ्या महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पिंपरी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे करत आहेत.