पिंपरीत कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्यावर सामाजिक बहिष्कार

0
1254

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या पिंपरी भाटनगर येथील ऐश्वर्या भाट-तामचीकर यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडीत राहणाऱ्या ऐश्वर्या नवरात्र निमित्त पिंपरी येथे माहेरी आल्या होत्या. यावेळी त्यांच्या घराजवळ दांडिया खेळण्यास त्या गेल्या होत्या. ऐश्वर्या दांडिया खेळायला आल्याचे पाहताच तेथील नागरिकांनी खेळ बंद  केला. यावर ऐश्वर्याला संशय आला ऐश्वर्या काही वेळ तिथेच थांबून राहिल्या. मग एका मैत्रिणीला त्यांनी बोलावले. मैत्रिणीला तिथेच थांबवून त्या पिंपरी पोलीस चौकीत गेल्या. ऐश्वर्या तिथून गेल्याचे पाहताच, पुन्हा दांडिया सुरू झाल्याचे मैत्रिणीने ऐश्वर्याला कळवले. यामुळे आपल्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याची तक्रार त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात केली. सहायक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी तपास करत आहेत.

दरम्यान, मे महिन्यात ऐश्वर्याने स्वतःच्याच विवाहात कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला. तर जून महिन्यात एका विवाहातच जात पंचायतीसमोर अशी चाचणी घेऊ नये यावर जोर धरला होता. यामुळेच आपल्यावर सामाजिक बहिषकार टाकून खच्चीकरण केले जात असल्याचे ऐश्वर्याचे म्हणणे आहे.