पाणीकपात मागे घेण्याबाबत बुधवारनंतर निर्णय घेणार – महापौर राहुल जाधव   

0
579

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ९८ टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परंतु शहरातील पाणीकपात मागे घेण्याबाबत सोमवारी (दि.५) बैठक बोलावली आहे. त्यानंतर बुधवारी (दि.७) पवना धरणातील पाणी पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी आज (शनिवार) दिली.    

पवना धरण ९८ टक्के भरल्याने धरणातून आज (शनिवार) ५५५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे शहरातील पाणी कपात मागे घेण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांतून होऊ लागली आहे. यावर पाणी कपात तुर्तास मागे घेण्यात येणार नाही. बहुतांश नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी नाहीत, असे महापौरांनी सांगितले.

ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या भागातील पाणी पुरवठ्याची वेळ आणि पाण्याचा दाब वाढवून देण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या आहेत. सर्वांना मुबलक पाणी मिळेल, याची दक्षता पाणीपुरवठा विभाग घेईल, असे महापौरांनी सांगितले.   सोमवारी बैठकीत पाणीकपात मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर बुधवारी पवना धरणातील जलपूजन केल्यानंतर दररोज पाणीपुरवठा कधीपासून करायचा याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.