पाच वर्षांत तब्बल ६ लाखांहून जास्त भारतीयांनी नागरिकात्वाचा केला त्याग

0
428

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – एकीकडे सीएएच्या माध्यमातून इतर शेजारी देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असताना दुसरीकडे गेल्या ५ वर्षांत तब्बल ६ लाखांहून जास्त भारतीयांनी आपल्या नागरिकात्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यासंदर्भातली चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या आकडेवारीचा समावेश आहे. या भारतीयांनी इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली आहे.

परदेशात स्थायिक होण्यासाठी नागरिकत्वाचा त्याग
राय यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०१७मध्ये १ लाख ३३ हजार भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला. २०१८मध्ये हाच आकडा १ लाख ३४ हजार झाला. २०१९मध्ये तो वाढून १ लाख ४४ हजारपर्यंत गेला. २०२०मध्ये करोनाची साथ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर असणारे निर्बंध, निरनिराळ्या देशांमध्ये लागू असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर हा आकडा खाली घसरून थेट ८५ हजार २४८ पर्यंत आला. तर २०२१मध्ये निर्बंध हटवण्यात आल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या नागरिकांचा आकडा १ लाख ११ हजार इतका झाला आहे.