पवना धरणात महापौरांच्या हस्ते जलपूजन

0
800

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मावळ तालुक्याला आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. महापौर राहुल जाधव यांनी आज बुधवारी (दि.७) सपत्नीक पवना धरणातील पाण्याचे जलपूजन केले.

याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पवना धरणाचे शाखाधिकारी गढवाल, कर्मचारी आदी उपस्थित होते. पवना धरणावर महापौर राहुल जाधव यांच्याहस्ते पवना धरणातील पाण्याचे विधीवत जलपूजन करण्यात आले.

यावेळी महापौर जाधव म्हणाले की, गेले ८३ दिवस शहरवासीयांना पाणीकपातीचा सामना करावा लागला आहे. आता पवना धरण १०० टक्के भरल्याने सर्वांना आनंद होत आहे. पवनामाई वर्षभर पिंपरी –चिंचवड शहराची तहान भागवत असते. जलपूजन केल्याचा आनंद अवर्णनीय असा होता. आजपासून शहराला स्वच्छ, नियमित, मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या सुचना पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या आहेत. यापुढे शहराला स्वच्छ, निर्मेळ पाणीपुरवठा होईल, असे महापौरांनी सांगितले.

दरम्यान, चार दिवसापूर्वी पवना धरण  धरण शंभर टक्के भरल्यानंतर शहरात एक दिवसाआड सुरू असलेली पाणीकपात मागे घेण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.५) महापौर, आयुक्त श्रावण हर्डीकर, गटनेते यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पवना धरणातील पाण्याचे जलपूजन केल्यानंतर बुधवारपासून पाणी कपात रद्द करण्यात येईल, असे महापौर जाधव यांनी सांगितले होते.