पलायन सत्र सुरुच: गुजरातचा व्यापारी पाच हजार कोटी घेऊन विदेशात फरार

0
866

दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्या आणि हिरा व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपयांचा देशातील बँकांना चुना लावून विदेशात फरार झाले असल्याचे प्रकरण ताजे असताना आता पाच हजार कोटींच्या घोटाळ्यातील आणखी एक आरोपी  देश सोडून फरार झाला आहे.

नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचा मालक नितीन संदेसरा हा देशातील बँकांची तब्बल पाच हजार कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. पोलिसांना नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, भावजयी दिप्तीबेन संदेसरा आणि कुटुंबातील अन्य सदस्य नायजेरियात लपल्याची माहिती आहे. भारत आणि नायजेरिया या दोन देशांत प्रत्यार्पण करार नसल्याने नितीन संदेसराला भारतात परत आणणे कठीण आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नितीनला दुबईतून ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. परंतु, ही माहिती खोटी असून ताब्यात घेण्याआधीच नितीन आणि त्याचा परिवार नायजेरियात पळून गेला असावा, असा अंदाज आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

याप्रकरणी आता सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने स्टर्लिंग बायोटिकचे गुंतवणूकदार नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाउंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेंचे माजी संचालक अनुप गर्ग आणि अन्य काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.