पंधरा दिवसांत पाऊस पडला नाही तर…

0
810

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पंधरा दिवसांत पाऊस पडला नाहीच तर पाण्याची परिस्थिती थोडी काळजी करण्यासारखी असेल, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. पीसीबी टुडे लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.

आयुक्त म्हणाले, सुदैवाने गतवर्षी पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतरही आपण दिवसाआड पाणी सुरू ठेवला. त्यामुळे धरणात पाणी बऱ्यापैकी शिल्लक आहे. मात्र, १५ दिवसांत पाऊस झाला नाही तर मात्र विचार करावा लागेल

पाणी पुरवठा परिस्थितीबद्दल अधिक माहिती विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी पीसीबी प्रतिनिधीला दिली. ते म्हणाले, गेले वर्षभर आपल्याकडे दिवसाआड पाणी आहे, मात्र कोणाचीही तक्रारी नाही.त्याचा चांगला परिणाम असा झाला की अजून तीन महिने सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका साठा शिल्लक आहे. आज परिस्थितीत तो साधारणतः ३३.२७ टक्के आहे. काळजी करण्यासारखीच स्थिती आहे. दरमहा ११ ते १२ टक्के पाणी साठी आवश्यक असतो. पावसाळा असल्याने शेतकऱ्यांना पाणी लागत नाही, पण जर का पाऊस झाला नाही तर शेतकरी नदी पात्रातून पाणी उचलतील. त्यासाठी पाणी जपूण वापरले पाहिजे.

गतवर्षी सप्टेंबर अखेर धरण १०० टक्के भरलेले होते. ते पाणी जूनपर्यंत पुरते. परंतु जर का हाच साठा ५० टक्के असता तर तो फक्त ५ महिनेच पुरेल. त्यामुळे आपण किती काळजीपूर्वक पाणी वापर केला पाहिजे याचा विचार करावा. पाण्याची मागणी कमी आहे कारण कोरोनामुळे १ – २ लाख लोक शहर सोडून गेलेत. लॉकडाऊनमुळे बहुतांशी उद्योग बंद होते. व्यापारी अस्थापना बंद होत्या. कपात न करता सर्वत्र पुरेसे पाणी मिळत होते, कुठेही तक्रार नाही. पाणी गळती व चोरीचे प्रमाण कमी झाले आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.

सह्याद्रीच्या रांगामध्ये जी काही धरणे आहेत ती सर्वच खाली आहेत, कारण पाऊस लांबला आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या धरणांत केवळ ३५ टक्के साठी आहे. त्यांनी ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात लागू करण्याचे जाहीर केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात तशी वेळ आली नाही, मात्र १५ दिवसांत पाऊस पडला नाहीच तर मात्र विविध पर्यांयांची चाचपणी सुरू करणार आहोत, असेही तांबे यांनी सांगितले.