नो-पार्किंगमध्ये कार उभी करुन आमदार गौतम चाबुकस्वारांची पोलीस कॉन्स्टेबला वर्दी उतरवण्याची धमकी

0
665

नारायणगाव, दि. १ (पीसीबी) –  वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून नो-पार्किंगमध्ये  कार उभी केल्याने पिंपरी विधान सभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वारांच्या कारला पोलिसांनी जॅमर लावला यामुळे चिडलेल्या चाबुकस्वारांनी पोलिस कॉन्स्टेबल दमदाटी करुन वर्दी उतरवण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि.३०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकातील हॉटेल ऋषी समोर घडली.  

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर पोलिसांनी नो- पार्किंग झोन केला आहे़. त्याठिकाणी रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पिंपरी विधान सभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वारांनी त्यांची कार उभा केली होती. यामुळे पोलिसांनी त्यांच्या कारला जॅमर लावला़. काही वेळेने कार चालक गाडीजवळ आला. त्याने जामर पहिल्यावर पोलिसांना आमदारांची गाडी आहे म्हणत हुज्जत घातली. तसेच दमही दिला. पण पोलिसांनी आपली गाडी नो-पार्किंग मध्ये उभी असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन झाले आहे, तुम्हाला पावती फाडावीच लागेल असे सांगितले.

यादरम्यान आमदार गौतम चाबुकस्वार कारच्या पुढील सीट वर येऊन बसले़. त्यांना चालकाने गाडीला पोलिसांनी जामर लावल्याचे सांगितले.  हे ऐकताच आमदारांना राग अनावर झाला़. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांना ‘चल रे जॅमर काढ, नाहीतर तुझी वर्दी उतरवेल, मी आमदार आहे. तुझ्या एसपीला फोन लावू का, जॅमर काढ’ अशी अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याशी सुमारे १० मिनिट हुज्जत घातली. शेवटी तेथे उपस्थित पत्रकारांनी कायदा सर्वांना समान असून जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, नारायणगावचे सरपंच आणि पंचायत समिती सभापती यांनीही कायद्याचा आदर करीत स्वत: २०० रुपयांची पावती फाडली आहे. आपणही लोकप्रतिनिधी आहात. आपण  कायद्याचा आदर करावा, असे सांगितल्यावर आमदार चाबुकस्वारांचे कार चालक पंकज सुरेश बोरकर यांनी २०० रुपये दंडाची पावती फाडली़.