शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा तीन दिवसांत सुरळीत न झाल्यास गाठ माझ्याशी – महेश लांडगे

0
786

भोसरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा तीन दिवसांत सुरळीत न झाल्यास माझ्याशी गाठ आहे, असा गर्भित इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, मकरंद निकम, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “भोसरीसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाले आहे. नागरिकांना अनियमित व कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर रोष वाढत आहे. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. येत्या तीन दिवसात शहराचा विस्कळित पाणीपुरवठा सुरळित झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावेत. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. तसेच मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित बिल्डरांची आहे. परंतु, अनेक बिल्डर ही व्यवस्था न करताच सदनिकांची सदनिका विक्रीनंतर आपले हात वर करतात. अशा बिल्डरांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.”

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “बिल्डरांनी सोसायटीतील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांकडून सोसायटीला पाण्याची व्यवस्था कशी केला जाणार आहे, याचा आराखडा घेण्यात यावा. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच ज्या व्यावसायिकाने पूर्वी बांधकाम केलेल्या सोसायट्यांमध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात यावेत. त्यासाठी सात दिवसांची मुदत द्यावी. मुदतीत व्यवस्था न केल्यास त्यांचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.”