नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने जवानांना पुरस्कार देणार – पंतप्रधान  

0
684

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे केली.

राष्ट्रीय पोलीस दिवसानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना मोदी काही वेळ भावूक झाले.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लडाख येथील हॉट स्प्रिंगमध्ये शहीद झालेल्या आपल्या निमलष्करी दलाच्या १० जवानांच्या आठवणीसाठी पोलीस स्मारक दिवस पाळला जातो. दरम्यान, नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथे राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले.

यावेळी मोदी म्हणाले की, आजचा दिवस त्या साहसी पोलीस जवानांच्या वीरगाथेला स्मरण करण्याचा दिवस आहे. ज्या जवानांनी लडाखच्या बर्फाळ डोंगरांमध्ये पहिल्यांदा देशाच्या संरक्षणाचे काम करताना आपले सर्वोच्च बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत कर्तव्याच्या मार्गावर चालणाऱ्या जवानांना माझे नमन.