निवडून येताच छिंदमला उपरती, शिवरायांच्या चरणी नतमस्तक

0
1164

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – अहमदनगरचा नगरसेवक श्रीपाद छिंदमला उपरती आली असून तो आज (बुधवार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे व राज्याचे आराध्यदैवत असून त्यांच्यासमोर मी नतमस्तक होऊन हा विजय स्वीकारला असल्याचे त्याने माध्यमांसमोर सांगितले. नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांमध्ये छिंदम हा प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष म्हणून निवडून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो इतक्या दिवस तडीपार होता. मंगळवारी तडीपारीची मुदत संपल्यामुळे तो आज नगरमध्ये आला.

आज (बुधवार) सकाळी नगरमध्ये आल्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. या महापुरुषांच्या आशीर्वादामुळे आपल्याला विजय मिळाल्याचे त्याने सांगितले.

काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची छिंदमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन तडीपार करण्यात आले होते. भाजपानेही त्याला पक्षातून काढून टाकले होते. दरम्यान, महापालिका निवडणुका लागल्यानंतर तो या निवडणुकीला अपक्ष म्हणून उभा राहिला होता. त्याने आपल्या पत्नीलाही या निवडणुकीला उभे केले होते. मात्र, त्याच्या पत्नीचा पराभव झाला. तर छिंदमने भाजपा उमेदवाराचा पराभव केला होता.