नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या चौघांनी दंड थोपटले

810

नागपूर, दि. १७ (पीसीबी) – भाजप नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात   काँग्रेसच्या चार नेत्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे २०१९ ची नागपूर लोकसभा निवडणूक रंगदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. गडकरींचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार विलास मुत्तेमवार हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या वेळी गडकरींच्याविरोधातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितली आहे. 

काँग्रेसचा दलित चेहरा  आणि राज्यात मंत्रिपदही सांभाळलेले नितीन राऊत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे  दीक्षाभूमी विरुद्ध संघभूमी असा सामना रंगू शकतो. कधीकाळी गडकरींमुळे भाजपचा झेंडा खांद्यावर घेणारे नाना पटोले आता गडकरींविरोधात शड्डू ठोकून तयार आहेत. नाना पटोलेंनी भाजपला    रामराम करत पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यामुळे नागपूरमधून गडकरींना पराभूत कऱण्यासाठी पटोले उत्सुक आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव आशिष देशमुख २०१४ मध्ये काटोल मतदारसंघातून भाजपकडून लढले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि काका अनिल देशमुख यांचा पराभव केला. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरुन त्यांचे भाजपसोबत बिनसले आणि आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आता त्यांनीसुध्दा गडकरींविरोधात लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या चौघांपैकी  कोणाला उमेदवारी मिळते, आणि ते गडकरींचा पराभव करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.