निगडीत पतीला चाकूचा धाक दाखवून ५५ हजार आणि दुचाकी घेऊन पत्नी फरार 

0
708

निगडी, दि. ३० (पीसीबी) – पतीपासून विभक्त झालेल्या पत्नीने पतीला चाकूचा धाक दाखवून कपाटात ठेवलेले तब्बल ५५ हजार रुपये आणि एक दुचाकी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज रविवार  सकाळी साडेआठच्या सुमारास  घडला.

सचिन प्रभाकर चव्हाण (वय ४०,रा. राजेशिवाजीनगर, चिखली ) असे लुटण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार सचिन यांची पत्नी सोनिया सचिन चव्हाण हिच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन आणि सोनिया हे पती-पत्नी आहेत. मात्र ते काही दिवसांपासून विभक्त राहतात. आज सकाळी साडेआठच्या सुमारास सोनिया हातात चाकू घेऊन घरात घुसली. तिने सचिन यांना चाकूचा धाक दाखवून कपाटात ठेवलेली ५५ हजारांची रोकड आणि पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी घेऊन फरार झाली. यावर सचिन यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.