निगडीत कार जिंकल्याचे सांगून महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

0
1115

निगडी, दि. २३ (पीसीबी) – ‘तुम्ही एका प्रतियोगितेमध्ये होंडा कार जिंकला आहात’ असे खोटे सांगून ती मिळवण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन फि भरावी लागेल असे नाटक करुन महिलेचा पेटीएम नंबर, बँक खाते क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक घेऊन अज्ञात दोघांनी महिलेच्या दोन बँक खात्यातून वेळोवेळी एकूण ३ लाख ८० हजार रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. ही घटना (२० फेब्रुवारी २०१८) ते (१४ मार्च २०१८) दरम्यान घडली.

शिवानी कुमारजगजीतसिंग राठौड (वय ३१, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, स्किम नं.१०, यमुनानगर निगडी. मुळ.रा. झारखंड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार कबीर कपुर आणि नेहारीका नावाच्या दोघाजणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिवानी राठौड यांना २० फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत कबीर कपुर आणि नेहारीका नावाच्या व्यक्तींनी फोन करुन ‘तुम्ही एका प्रतियोगितेमध्ये होंडा कार जिंकला आहात’ असे खोटे सांगून ती मिळवण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन फि भरावी लागेल असे नाटक करुन महिलेचा पेटीएम नंबर, बँक खाते क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक घेऊन शिवानी यांच्या एसबीआय आणि एचडीएफसी बँक खात्यातून वेळोवेळी असे एकूण ३ लाख ८० हजार रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी कबीर कपुर आणि नेहारीका नावाच्या व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.व्ही.आवताडे तपास करत आहेत.