मुस्लिमांच्या नमाजासाठी मंदिरांनी आपली दारे उघडली

0
1116

तिरुवनंतपुरम, दि. २३ (पीसीबी) – केरळमध्ये बकरी ईदनिमित्त धार्मिक सलोख्याचे एक अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. अवघे केरळ सद्या पुराच्या पाण्याखाली बुडालेले आहे. येथील ईरावतूर भागातली एक मशीदही अशीच पाण्यात बुडाली आहे. बकरी ईदला नमाज कुठे अदा करायची हा प्रश्न येथील मुस्लिमांना सतावत होता, तेव्हा येथील मंदिरांनी आपली दारे नमाजासाठी उघडली.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात मालाजावळ ईरावतूर गाव आहे. येथील कोचुकाडव महल मशीदीसह अन्य अनेक मशीदी पुरामुळे पाण्याखाली आहेत. बकरी ईदला नमाज कुठे अदा करायची या विवंचनेत असणाऱ्या येथील मुस्लिमांच्या मदतीला पुरुपिलिकव रक्तेश्वरी मंदिराचे अधिकारी धावून आले. मंदिराचे सभागृह त्यांनी मुस्लिमांना नमाजासाठी खुले करून दिले आणि तेथे येऊन नमाज पठण करण्याचे आमंत्रण दिले.

सुमारे ३०० मुस्लिमांनी या मंदिरात नमाज अदा केली आणि या मंदिर व्यवस्थापनाचे आभारही मानले. ‘सर्वात आधी आपण माणूस आहोत. आपण एकाच ईश्वराची मुले आहोत हे आपण अशा आपत्तीच्या वेळी ध्यानात ठेवायला हवे,’ असे मंदिर व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.