काँग्रेसने गुजरातच्या अल्पेश ठाकोरकडे सोपवली मोठी जबाबदारी

0
877

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांच्याकडे काँग्रेसने बिहार राज्याच्या प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. बिहारमधील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता काँग्रेसने अल्पेश यांच्यावर  महत्त्वाची कामगिरी सोपविली  आहे.

बिहारच्या राजकारणात मागासवर्गीय समाज  केंद्रबिंदू मानला जात आहे.  त्यामुळे या समाजाला  काँग्रेसकडे आकृष्ट करण्यासाठी ओबीसी नेत्याला बिहारच्या प्रभारीपदी नियुक्त केल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने तीन नवे सचिव नियुक्त केले आहेत. बी. पी. सिंह,  मोहम्मद जावेद आणि सरत राऊत यांना पश्चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे.

चल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप यांना महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  जम्मू-काश्मीरच्या प्रभारीपदाची धुरा शकील अहम खान यांच्या खांद्यावर सोपवली  आहे. तर रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांना उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश धमानी यांच्याकडे उत्तराखडंचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर  त्यांनी  पक्षांतर्गत  बदल करण्याचा सपाटा लावला आहे. या बदलांमध्ये नव्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहेत.