निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर

0
235

कित्येक वर्षांपासून येथे सुरक्षारक्षकच नाही याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून तातडीने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी दि.१७ (प्रतिनिधी)- निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा गेल्या कित्येक वर्षापासुन वाऱ्यावरच असुन आतापर्यंत याठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याची बाब भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी समोर आणली असुन स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच न नेमल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची व याठिकाणी तातडीने चोवीस तास सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, “निगडी बसस्थानकाशेजारील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन मी आपणास दोनदा लेखी पत्र देऊन २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भात मागणी केलेली होती तरीही याची आपण गांभीर्याने दखल घेतलेलीच नाही.

महाराणा प्रताप उद्यानात गेले कित्येक वर्ष सुरक्षारक्षकच नाही, मग कुणाच्या वरदहस्तामुळे येथे सुरक्षारक्षक नेमला जात नाही किंवा येथील सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांच्या संगनमताने फक्त रजिस्टरवर हजेरी लावुन जाण्याचे काम करतात का? याचेही उत्तर मिळावे कारण बऱ्याच वर्ष व महिन्यांपासुन येथे कुणीही सुरक्षारक्षक अस्तित्वातच नाही, एवढ्या वर्दळीच्या आणि स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसावा यात काय गौडबंगाल असेल? याचीही आपण गांभीर्याने सखोल चौकशी करावी.

निगडी बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या या उद्यानात प्रवाशांची नेहमीच उठबस असते पण याच ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात, याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे, रात्रीही बऱ्याच उशिरापर्यंत काही प्रेमी युगुल याठिकाणी बसलेले असतात, महत्वाचं म्हणजे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या मागेच त्याच चौथाऱ्यावर काही मनोरुग्ण बसलेले असतात जमा केलेले अन्न ते त्याठिकाणीच बसुन खाताना दिसतात त्यामुळे या पुतळ्याचे पावित्र्य भंग होत आहे, उद्या जर त्यांनी या पुतळ्याला काही इजा पोहचविली किंवा काही विटंबना केली तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन याची संपुर्ण जबाबदारी आपली असेल, आयुक्तांनाच याचे उत्तर देणे बंधनकारक असेल याचाही आपण विचार करणे महत्वाचे आहे.

तरी आम्ही भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने अशी मागणी करतो की लवकरात लवकर आपण याठिकाणी २४ तासांसाठी सुरक्षारक्षक नेमावे व आतापर्यंत याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याबाबतची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आक्रमक पाऊले उचलावे लागतील” असे त्यात नमुद केले आहे