“…. नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल होणार”; राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाला सुनावलं

0
295

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) : महापालिका प्रशासनाची राष्ट्रीय हरित लवादाने कानउघडणी करूनही शहरातील नदीपात्रात भराव टाकून इमारती आणि घरे बांधली जात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेदेखील होत असल्याने त्यामुळे यंदा पवना आणि मुळा नदीला पूर आल्यास नदीकाठावरील 15 भागांना त्यातही पिंपरी, सांगवीला सर्वाधिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. गटार, नाले, ओढे यामध्ये अतिक्रमण केलेल्यांनी त्वरित ती काढावीत. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून मुळा नदी 11 किलो मीटर, पवना नदी 25 किलो मीटर आणि इंद्रायणीनदी 20.60 किलो मीटर वाहते. मुळा नदीचे शहरातून कमी पात्र वाहत असले तरी मुळानदीला दरवर्षी पूर येतो. त्यामुळे सांगवी भागातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पवना आणि मुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणी नदीत सोडले जाते. धरणातून जादा पाणी सोडल्यास नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा सामना करावा लागतो. सन 2019 मध्ये शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्यांचे पुरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. पुरामुळे सुमारे 5 हजार 801 नागरिक बाधित झाले होते. पुरानंतर नदीपात्रातील भराव टाकण्याचे प्रकार आणि अतिक्रमणे थांबतील, अशी अपेक्षाही होती. राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेची चांगलीच कानउघडणी केली होती.

नदीपात्रातील राडारोडा काढून घेऊन पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कोगदोपत्री कारवाई करीत अहवाल सादर केला होता. मात्र, प्रत्यक्षात जैसे थे स्थिती आहे. पवना आणि मुळा नदीचा काही भाग बुजविल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. या प्रकरणामुळे नदीपात्र अरुंद होऊन आकसत आहे. परिणामी, शहरावरील पुराच्या संकटाचे सावट आणखीन वाढले आहे. त्यामुळे पवना, मुळा नदीपात्रालगतच्या लोकवस्त्यांना यंदाही पुराचा धोका आहे. पवना नदीलगत 10 ठिकाणी आणि मुळा नदी पात्रालगतच्या 5 ठिकाणांना धोका आहे.

पवना नदी : पिंपरीतील संजय गांधी नगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, भाटनगर, माता रमाईनगर, बौद्धनगर, चिंचवडमधील मोरया गोसावी परिसर, रहाटणी स्मशानभूमी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, सांगवी.

मुळा नदी : वाकडमधील ममतानगर, कस्पटे वस्ती परिसर, सांगवी मुळा नदीकाठ, मधुबन सोसायटी, संगमनगर, पवनावस्ती, पिंपळे निलख, दापोडी, हॅरिस पुलाजवळ, बोपखेल, गणेशनगर परिसर.

संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच धोका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आपत्ती निवारणाशी संबंधित विभाग, तसेच प्रभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कामकाज करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत. ज्या नागरिक, दुकानदारांनी गटार, नाले, ओढे यामध्ये अतिक्रमण करुन दुकाने बांधली आहेत. त्यांनी त्वरित ती काढावीत. अन्यथा महापालिकेमार्फत कायदेशीर कारवाई करत बांधकाम पाडले जाईल. फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

पावसाळ्यात ज्या भागात पाणी, कचरा साचला आहे. भिंती पडल्या आहेत. झाडे पडली आहेत अशी माहिती नागरिकांनी महापालिकेला द्यावी. त्यासाठी 9922501450 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर, 8888006666 सारथी हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पुर नियंत्रण विभाग!

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष – मुख्य कार्यालय 020-67331111
020-28331111

अ क्षेत्रिय कार्यालय : 020-68334050 9922501454 9922501453 [email protected]
ब क्षेत्रिय कार्यालय : 9922501455 9922501456 [email protected]
क क्षेत्रिय कार्यालय : 020-68334550 9922501457 9922501458 [email protected]
ड क्षेत्रिय कार्यालय : 9922501459 9922501460 [email protected]
इ क्षेत्रिय कार्यालय : 8605722777 8605822777 [email protected]
फ क्षेत्रिय कार्यालय : 020-68335350 8605422888 [email protected]
ग क्षेत्रिय कार्यालय : 020-68335550 7887868555 7887879555 [email protected]
ह क्षेत्रिय कार्यालय : 020-68335750 9130050666 [email protected]

अग्निशमन विभाग–: 020- 27423333 / 020-27422405/ (मो) 9922501475
आपत्ती व्यवस्थापन कक्ष –: 020- 2767331158 / (मो) 8888844210
ई मेल – [email protected]
फेस बुक – https://www.facebook.com/pcmcindia.gov.in
ट्विटर – https://twitter.com/pcmcindiagovin

नागरिकांनी पावसाळापूर्व काळात तसेच पावसाळयाच्या काळात पाणी साचने, नाले, गटारे यावरील तसेच याजवळील धोकादायक भिंती, धोकादायक घरे, धोकादायक इमारती यांची ठिकाणे, नाल्यानजिक, गटारांनजिक साठून राहीलेला कचरा, निरुपयोगी बांधकाम साहित्य यांची ठिकाणे याची माहिती या नंबरवर देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.