नाशिकमध्ये भरधाव वाहनाने ७ मुलांना उडवले; एकाच जागीच मृत्यू

0
546

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – नाशिकमध्ये नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी जखमी झाली आहेत. त्यातील दोघेजण गंभीर आहेत. हा अपघात नाशिकमधील वड़ाळागावाजवळ घडला.

विशाल पवार (वय ११) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर बाकीचे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळागावात राहणारी सात लहान मुले आज (रविवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर मार लागल्याने विशालचा जागीच मृत्यू झाला. तर इतर मुले जखमी झाली. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. पोलिस तपास करत आहेत.