वानवडीत संतापलेल्या जमावाच्या हल्ल्यात सराईताचा मृत्यू

0
1121

पुणे, दि. १४ (पीसीबी) – सराईताने महिलेची छेड काढून घरावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केल्याने संतापलेल्या जमावाने बांबु आणि काठ्याने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सराईताचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वानवडी येथील राजीव गांधी कॉलनीमध्ये शनिवारी (दि.१३) रात्री दहाच्या सुमारास घडली.

अक्षय सोनावणे (वय २८, रा़ दरोडे वस्ती, वानवडी) असे जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अक्षय हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरी मारामारी असे एकूण १७ गुन्हे दाखल होते. त्याला दारु आणि व्हाईटनर ओढण्याचे वेसन होते. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो महंमदवाडी येथील राजीव गांधी कॉलनीमध्ये गेला होता. दारुच्या नशेत त्याने तेथील एका महिलेची छेड काढली. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. ही गोष्ट अक्षयला समजल्यानंतर तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा राजीव गांधी कॉलनीत गेला. त्याने त्या महिलेच्या घरावर दगडफेक केली. तसेच तेथे पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी तेथील जमावाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, अक्षयने त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली. यावर संतापलेल्या जमावाने अक्षय याला बांबु आणि काठ्याने जबर मारहाण केली. यामध्ये तो जबर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अक्षय याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.