नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान ही काळाची गरज – डॉ. दत्ता

0
715

पिंपरी,दि.20(पीसीबी) – आजच्या बदलत्या परिस्थितीत मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी तंत्रज्ञान संशोधनाची स्पर्धा व मागणी वाढत चालली आहे याकरिता विद्यार्थी दशेतच संशोधनाची बीजे रोवली पाहिजेत. असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ए आय सी टी ई) नवी दिल्लीचे उप संचालक डॉ. अमित दत्ता यांनी केले.

डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ए आय सी टी ई) नवी दिल्ली पुरस्कृत “सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन काँक्रीट टेक्नॉलॉजी”या विषयावर आंतरराष्ट्रीय ई परिषद च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठान चे विश्वस्त तेजस पाटील , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चास्कर, अमेरिकेतील इंटेलिजंट काँक्रीट कंपनीचे संचालक डॉ जॉन बेलकॉवित्झ, अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटचे मानद सचिव डॉ. एस.के. मांजरेकर, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय वाढई स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे व परिषदेचे समन्वयक डॉ संदीप शियेकर आदी उपस्थित होते.

डॉ. अमित दत्ता म्हणाले कि, देशामध्ये तंत्रज्ञान शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद करीत असून त्यासाठी नवनवीन उपक्रम अमलात आणले जात आहेत व त्याचाच भाग म्हणून या सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी पुरस्कृत केले जात आहे. याचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधनाची ओळख होऊन त्यांच्यातून यासारखे संशोधन होण्यास प्रोत्साहन व मदत मिळावी व मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीत होईल. तसेच आजच्या शिक्षकांनी आधुनिक अध्ययन पद्धती वापरून शिक्षण दिले पाहिजे.ज्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करण्यास मदत होईल.

डॉ. मनोहर चास्कर म्हणाले कि,यासारख्या परिषदेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यास उपयोगी पडतात व याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संशोधनात व प्रकल्पामध्ये दर्जा उंचावण्यासाठी होतो. यासारखे स्तुत्य प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कायम पाठीशी राहून योग्य ती मदत करण्यास कटिबद्ध राहतील याची ग्वाही दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या विषयाचा उपयोग काँक्रीटच्या क्षेत्रात करून घेणे अनिवार्य झाला आहे व यातूनच प्रगतीचे मार्ग मिळत जातील अशी इच्छा व्यक्त केली.

डॉ. मांजरेकर म्हणाले आजच्या युगात शाश्वत प्रगती ही फार मोठे आव्हान होऊन बसले आहे हे आव्हान पेलणे याकरिता यासारख्या परिषदा घडवून आणणे खूप गरजेचे होऊन बसले आहे याकरिता सीमांचे बंधन न लादता जगातील सर्व राष्ट्रातील संशोधकांनी पुढे येऊन ज्ञानाची व संशोधनाची देवाण-घेवाण केली पाहिजे. अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून या संस्थेमध्ये जगातील सर्व नामांकित काँक्रीट मध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ जोडले गेले आहेत व या संस्थेच्या सहकार्याने ही परिषद आयोजित होत असून याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना मिळेल अशी ग्वाही दिली.

डॉ जॉन बेलकॉवित्झ म्हणाले कि,कॉंक्रीट हा असा घटक आहे की तो कोणत्याही आकारात आकारू शकतो व त्याच्या या गुणधर्मामुळे तो भरपूर ठिकाणी वापरात येतो परंतु त्याच्या पाठीमागील दुष्परिणाम वेळीच ओळखून त्यामध्ये बदल घडणे गरजेचे आहे व त्या करिता या विषयात संशोधन घडणे काळाची गरज झाली आहे. काँक्रिटच्या पारंपारिक पद्धतीच्या वापराने प्रगती अशक्य होऊन बसले आहे व त्या करिता नवनवीन संकल्पना जसे की इंटेलिजंट काँक्रीट अमलात आणले पाहिजे जेणेकरून जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होणार नाही व प्रगती चिरकाल टिकेल ही अशा व्यक्त केली.

श्री.तेजस पाटील म्हणाले आजच्या कोविड महामारी च्या काळात शाश्वत प्रगती ही महत्वाची बाब निर्माण झाली आहे व याकरिता आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणे गरजेचे आहे तसेच नवीन संशोधकाने व विद्यार्थ्याने जीवसृष्टीचा विचार करून व त्याच्या संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण संशोधन घडवून आणण्याची आवश्यकता आहे.

डॉ. नीरज व्यवहारे म्हणाले कि, जगाच्या उभारणीमध्ये अभियंताचा सहभाग हा अविभाज्य भाग बनला आहे. मूलभूत सेवा पुरवण्या करिता स्थापत्य अभियंता चा खूप मोठा सहभाग आहे व देशाच्या प्रगतीमध्ये स्थापत्य अभियंता खूप मोठी भूमिका पार पाडत आहे. तसेच देशाच्या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठी रक्कम की बांधकामासाठी देण्यात आली आहे व त्याकरता नवनवीन तंत्रज्ञान व पद्धती अमलात आणून बांधकाम करणे गरजेचे बनले आहे ह्यासाठी संशोधकांनी नाविन्यपूर्ण व कमी काळात, कमी खर्चात व टिकाऊ बांधकाम पद्धती विकसित करून त्या अमलात आणल्या पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही व देशाची प्रगती घडून येईल

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाची माहिती दिली स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे यांनी विभागाची विस्तृत माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले परिषदेचे समन्वयक डॉ संदीप शियेकर परिषदेची माहिती दिली. या परिषदेमध्ये एकूण 121 शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. यामध्ये युके यु एस ए ऑस्ट्रेलिया स्पेन ऑस्ट्रिया स्विझर्लांड जर्मनी क्युबा साऊथ आफ्रिका डेन्मार्क या देशांमधून शोध निबंध प्राप्त झाले आहेत. तसेच इंजिनीरेड सिमेंटीशस कंपोसिट, जिओ पॉलिमर बाँडर, बॅक्टरीया इम्प्रेग्नंटेड, ग्रीन सिमेंट, फायबर रेनफॉर्समेंट या विषयावर शोध निबंध प्रस्तुत केले जाणार आहेत व थ्रीडी प्रिंटिंग फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री सस्टेनेबल काँक्रीट युजिंग इंडस्ट्रियल अँड नॅचरल वेस्ट यासारख्या नाविन्यपूर्ण काँक्रीटच्या विषयातील कामाचे लेख प्रस्तुत केले जाणार आहेत

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटील यांनी केले. परिषदेच्या आयोजनासाठी स्थापत्य विभागातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. या परिषदेचा समारोप दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी श्रीमती ममताराणी अग्रवाल ॲडव्हायझर ए आय सी टी ई न्यू दिल्ली व डॉ. डी व्ही जाधव जॉइंट डायरेक्टर डी. टी. ई. यांच्या उपस्थितीत स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये होणार आहे. या परिषदेचे आयोजनात स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे व कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांचे सहकार्य लाभले आहे व संकुलाचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे व संकुलाचे चेअरमन मा. नामदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.