‘नाणार’वरून संघर्ष, राजदंडाची पळवापळवी; आमदार आणि चोपदार यांच्यात झटापट

0
455

नागपूर, दि. १२ (पीसीबी) – सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत संघर्षाची ठिणगी पेटविणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून बुधवारी विधानसभेत शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्येच जोरदार जुंपली. कोकणवासींचा विरोध असणारा नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची भूमिका आधी कोणी मांडायची यावरून शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले. यावेळी शिवसेना तसेच काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभाध्यक्षांसमोरील राजदंडच पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार आणि चोपदार यांच्यात जोरदार झटापट झाली. धावाधाव, पाठलाग, घोषणाबाजी अशा गोंधळाच्या वातावरणातच अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले.

कोकणवासींसाठी संवेदनशील बनलेल्या ‘नाणार’च्या मुद्द्यावरून बुधवारी सभागृहात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये श्रेयाची लढाई दिसून आली. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नाणारवासी विधिमंडळावर मोर्चा घेऊन आले असून, त्यांना सामोरे जाण्यापूर्वी आम्हाला सभागृहात भूमिका मांडू द्या, अशी मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी केली. तर याच मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिल्याने विरोधी पक्षाला प्रथम बोलण्याची संधी द्यावी, असा आग्रह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धरला. त्यावर २९३वरील प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिल्यानंतर संधी देतो, असे विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितले. मात्र या चर्चेवरील उत्तर लांबत गेल्याने शिवसेनेच्या सदस्यांचा धीर सुटला.