नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात आंदोलनाने; पहिल्याच दिवशी शाळा बंद राहणार

0
520

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्याच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातच आंदोलनाने होणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शंभर टक्के अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदान गाठणार आहेत. त्यामुळे, शाळा भरणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात प्रवेशोत्सवाने केली जाते. विद्यार्थ्यांना खाऊ, शालेय साहित्याचे वाटप, त्यांचे जंगी स्वागत शाळांमध्ये होते. यंदा मात्र पहिल्याच दिवशी शाळा भरणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांना शंभर टक्के अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्य कायम विनाअनुदानित-अनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवारपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्या १९ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक अनुदानाची मागणी करत आहेत. शासनाने काही शाळांचे मूल्यांकन करून त्यांना २० टक्के अनुदान दिले. मात्र एकाही शाळेला शंभर टक्के अनुदान मिळाले नाही. पुरेसे अर्थसाहाय्य नसल्यामुळे राज्यातील साधारण साडेपाच हजार शाळा येत्या काळात बंद होतील. यातील ८० टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.