थेरगावमध्ये घरभाडे वेळेवर देत नसल्याच्या रागातून मालकाने भाडेकरुला केली मारहाण

0
382

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – घरभाडे वेळेवर देत नसल्याच्या रागातून मालक दाम्पत्याने भाडेकरु दाम्पत्याला हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील वस्तूंची तोडफोड करुन नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी तीनच्या सुमारास थेरगावातील श्री कृष्ण कॉलनी क्र. ३ येथे घडली.

याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घरमालक चारुशिला किशोर जाधव (वय २६) आणि त्यांचे पती किशोर भिमराव जाधव (रा. सर्वे क्र. २३/२, श्री कृष्ण कॉलनी क्र. ३, थेरगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर आणि चारुशिला यांनी थेरगावातील श्री कृष्ण कॉलनी क्र. ३ येथे काही खोल्या भाड्याने दिल्या आहेत. या ठिकाणी फिर्यादी महिला आणि त्यांचे पती राहतात. ते खोलीचे भाडे वेळेवर देत नसल्याच्या कारणावरुन दोघा आरोपींनी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी ३० वर्षीय महिला आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच घरातील टीव्ही, कपाट आणि कुलरची तोडफोड करुन नुकसान केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.