नवी मुंबईला शिवाजी महाराज, ठाण्याला जिजाबाई, पुण्याला संभाजी महाराज यांचे नाव द्या – अबू आझमी

0
2140

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज, ठाण्याला राजमाता जिजाबाई, पुण्याला संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी  समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (बुधवार) विधानसभेमध्ये केली. विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’अशी घोषणा दिली.

ते म्हणाले की,  स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे नाव ठाणे शहराला देऊन ठाणे शहराचे नाव बदलून ते ‘जिजामाता नगर’असे करण्यात यावे. तसेच, शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुणे शहराचे नामकरण करुन पुण्याला छत्रपती संभाजी नगर नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान याआधी संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केली होती. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले आहे. त्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे, असे ब्रिगेडच्या नेत्यांनी म्हटले होते. याशिवाय सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करावे, अशीही मागणी संघटनेने केली होती.