नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार

0
634

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुणे आणि मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते हिंजवडी आणि कल्याण येथे मेट्रो कामाचे भूमीपूजन होणार आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने या भूमीपूजन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्याने शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने  राजभवनावर जातील. व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करतील आणि त्यानंतर ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

दुपारी नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने कल्याणला रवाना होतील. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आणि अल्प उत्पन्न गटासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. संध्याकाळी नरेंद्र मोदी पुण्याला रवाना होतील. हिंजवडीत ते मेट्रो कामाचे भूमीपूजन करतील. त्याचप्रमाणे याठिकाणी मोदी यांची जाहीर सभाही होणार आहे.