नग्नावस्थेत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची लुट; गोल्डन बाबा टोळीचा पर्दाफाश

852

नाशिक, दि. १७ (पीसीबी) – ‘गोल्डन बाबा’ असल्याचे सांगून नग्नावस्थेत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची लुट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. नाशिकच्या गुन्हे शाखेने भामट्या गोल्डन बाबासह चौघांना गुजरातमधून अटक केली आहे.

सुरेशनाथ सुरमनाथ मदारी, राजूनाथ जोरानाथ मदारी, राजूनाथ अर्जुननाथ मदारी आणि श्रावण कमलनाथ मदारी असे गुजरातमधून अटक करण्यात आलेल्या चौघा चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात नाशिकच्या म्हसरुळ परिसरात एक निवृत्त पोलिस उपनिरीक्षक इव्हिनिंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका वॅगन आर कारमधून तिघे जण खाली उतरले. त्यांच्या पाठोपाठ एक माणूस नग्नावस्थेत कार मधून खाली उतरला. ‘मी गोल्डन बाबा आहे. परदेशातून भक्त माझ्या दर्शनाला येतात. आज तुझे नशीब आहे की मी तुला प्रकट झालो. ये माझा आशीर्वाद घेऊन मला दक्षिणा दे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील’ असे म्हणत त्याने पोलिसाला जवळ बोलावले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन ते पसार झाले. ते जाताच आपली लूट झाल्याचे त्या निवृत्त पोलीसाच्या लक्षात आले.  त्याने तातडीने म्हसरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नाशिकच्या गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तातडीने गुजरात येथे जाऊन चारही आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून एक वॅगन आर कार आणि दागिन्यांसह एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.