नक्षलवाद्यांना अज्ञात राजकीय शक्तींचा पाठिंबा असू शकतो – संजय राऊत  

0
711

मुंबई, दि. २ (पीसीबी) – गडचिरोलीत झालेल्या  नक्षलवादी हल्ल्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार असणाऱ्या  मुख्यमंत्री  फडणवीस यांचा राजीनामा मागितल्यानंतर आता नक्षलवाद्यांना  अज्ञात राजकीय शक्तींचा पाठिंबा असू शकतो,  असे धक्कादायक  विधान  शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

नक्षलविरोधी पथकातील जवानांची वाहतूक खासगी वाहनांमधून केली जात  होती. तरीही जांभूरखेडा येथे नक्षल्यांनी खासगी वाहनातून जाणाऱ्या जवानांना लक्ष्य केले. जवानांविषयीची बातमी नक्षलीपर्यंत कोणी पोहोचवली,  हे देशद्रोही कोण होते? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना’च्या  अग्रलेखातून  केला आहे.

दरम्यान, गडचिरोलीत झालेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले आहेत.  नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर म्हणून लष्कराकडून जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु केले आहे.