युपीए सरकारनेही सर्जिकल स्ट्राइक केले, पण आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही – मनमोहन सिंग  

0
726

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइकही झाले होते,  पण आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही.  भाजप सरकार  आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं आहे, अशी घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत  मनमोहन सिंग यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी मनमोहन सिंग यांनी भाजप अध्यक्ष  अमित शहा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर पलटवार केला.  मुंबई हल्ल्यानंतर १४ दिवसांच्या आत हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित कऱण्यात आले होते. युपीए सरकारने मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर अमेरिकेकडून १० लाख डॉलर्सचे बक्षीसही जाहीर करुन घेतले.  पण आम्ही यासंबंधी कधी जाहीर  वाच्यता केली  नाही, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.

२६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या सरकारने सागरी सुरक्षा मजबूत केली होती. राष्ट्रीय दहशतवादी विरोधी केंद्राची (एनसीटीसी)  संकल्पना मांडली होती.  पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध केला होता, असे मनमोहन सिंग यांनी  सांगितले.