धार्मिक चिन्हांचे खलनायकीकरण

0
244

पिंपरी, दि.०८ (पीसीबी) : पूर्वी समाजात विविध लोक आपण बघायचो जसे कुणी कपाळावर मोठा टीका लावणारे असतील, कुणी देवी-देवतांचे बिल्ले कपड्यांवर लावून फिरत असतील. सोशल मीडियावरसुद्धा लोकांचे डीपी, प्रोफाइल फोटो जर देवीदेवतांचे, श्रीरामांचे, भगव्या झेंड्याचे असले तर ती व्यक्ती म्हणजे धार्मिक, देवा-धर्माची प्रचंड आवड असणारी नैतिकता पाळणारी अशी मानली जाई. कारण जिथे प्रत्येकाचा स्वतः च्या फोटोंचे प्रदर्शन करण्यावर भर होता तिथे हे लोक देवीदेवतांच्या प्रतिमा प्रोफाइल फोटो म्हणून लावत असत. परंतु आज चित्र वेगळं आहे. श्रीराम सर्वांनाच पूजनीय, भगवा झेंडा म्हणजे प्राणच. परंतु आजकाल याच जीव की प्राण असलेल्या प्रतीकांची प्रचंड भीती वाटू लागली आहे.

पूर्वी समाजात विविध लोक आपण बघायचो जसे कुणी कपाळावर मोठा टीका लावणारे असतील, कुणी देवी-देवतांचे बिल्ले कपड्यांवर लावून फिरत असतील. सोशल मीडियावरसुद्धा लोकांचे डीपी, प्रोफाइल फोटो जर देवीदेवतांचे, श्रीरामांचे, भगव्या झेंड्याचे असले तर ती व्यक्ती म्हणजे धार्मिक, देवा-धर्माची प्रचंड आवड असणारी नैतिकता पाळणारी अशी मानली जाई. कारण जिथे प्रत्येकाचा स्वतः च्या फोटोंचे प्रदर्शन करण्यावर भर होता तेव्हा हे लोक देवीदेवतांच्या प्रतिमा प्रोफाइल फोटो म्हणून लावत असत. परंतु आज चित्र वेगळं आहे. श्रीराम सर्वांनाच पूजनीय, भगवा झेंडा म्हणजे प्राणच. परंतु आजकाल याच प्रतीकांची प्रचंड भीती वाटू लागली आहे.
भगवान श्रीराम, देवीदेवता, भगवा झेंडा म्हणजे समानतेचे, सर्वांना सामान वागणुकीचे, प्रेमाचे, धैर्याचे, शक्तीचे आणि हिम्मतीचे प्रतीक. ज्यांच्या लेखी कुणी उच्चनीच नव्हता, जे कायम सर्वांना सोबत घेऊन चालले, ज्यांच्या नजरेत स्वधर्माइतकाच परधर्माचा सुद्धा आदर होता. स्वतः च्या सोडाच जिथे शत्रूंच्या स्त्रियांचाही पूर्ण सन्मान होता अशा समानतेच्या प्रतीकांच खलनायकीकरण सद्यस्थितीत सुरु असल्याचे आपल्या लक्षात येईल. अशी प्रतीके प्रोफाइल फोटो म्हणून ठेवणारे वरील सर्व समानतेच्या, स्त्रीसन्मानाच्या तत्वांना तिलांजली देतांना सोशल मीडियावर आपण रोजच बघू शकतो. ह्या देवीदेवतांची प्रतीके वापरून हे लोक असे काही वागतात ज्यामुळे ह्या प्रतिकांबद्दल आपल्या मनात दहशद आणि भीती निर्माण व्हावी, घृणा निर्माण व्हावी. ही प्रतीके वापरून हे लोक आपल्याला जणू विक्षिप्त वागण्याचा अधिकृत परवाना मिळाल्याप्रमाणे व्यवहार करतात, आपलं मत व्यक्त करतात, प्रतिक्रिया देतात. ’गर्व से कहो हम हिंदू है’ व ’जय श्रीराम’ म्हणणार्‍यांची तर विशेष भीती वाटू लागली आहे. कारण हेच लोक आपल्या वागणुकीतून आणि बोलण्यातून हिंदू धर्म व श्रीरामांची बदनामी करत आहेत.
तुम्ही सोशल मीडियावर असाल तर फेसबुकवर किंवा व्हाट्सऍप वर जाऊन आपल्या मित्रयादीतील किंवा इतर कुणाचेही प्रोफाइल फोटो तपासा. ज्यांच्या प्रोफाइल फोटोवर श्रीराम आणि भगवा झेंडा असेल तर त्यांच्या पोस्ट बघा, इतरांच्या पोस्टवर त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात हे बघा. अत्यंत, विचित्र, विक्षिप्त, द्वेषपूर्ण आणि खूप वाईट भाषेत पोस्ट आणि प्रतिक्रिया आपल्याला दिसतील. अर्थात असे प्रोफाइल फोटो ठेवणारे 100% सर्वच असे असतील असे नाही, परंतु त्यातील बहुतांश याच प्रकारात मोडत असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. यातील अनेकांचे तर फेफ (खोटे) अकाउंट आहेत. सरकार विरोधी बोलणार्‍यांवर झुंडीने तुटून पडणार्‍यांपैकी बहुतांश अकाउंटवर श्रीराम, देवीदेवता किंवा भगव्या झेंड्याचा प्रोफाइल फोटो असतो.

आता हा लेख वाचून काही महाभाग म्हणतील की हा श्रीरामांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. देवीदेवतांना बदनाम करण्याचा कुटील डाव आहे वगैरे वगैरे. पण आत्मपरीक्षण करणार नाहीत की आपणच वागणुकीतून श्रीरामांची व भगव्याची प्रतिमा मलीन करतोय. हे प्रोफाइल फोटो ठेवणारे सर्व काय श्रीरामाचे निस्वार्थ भक्त आहेत काय? श्रीरामाच्या नावाने आपला स्वार्थ साधण्याचा डाव सरळ सरळ डोळ्यांनी दिसत असतांना कुणीच त्याविरोधात बोलू नये? आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी व देशातील नागरिकांची, देशाची काळजी वाटून सत्य लिहिणार्‍यांना झुंडीने ट्रोल करण्यासाठी जर श्रीरामांच्या प्रतिमेचा आणि भगव्याचा वापर होत असेल तो कुण्याही प्रामाणिक श्रीराम भक्ताला व देशभक्ताला मान्य असूच शकत नाही. आज श्रीराम जरी असते तर त्यांना ह्या गोष्टी मान्य असत्या काय? याचा विचार आपण केला पाहिजे.

स्वतः च्या पत्नीबद्दल म्हणजेच सितामातेबद्दल वाईट बोलणार्‍या अयोध्येतील सामान्य लोकांच्या मतांचा सुद्धा श्रीरामांनी आदरच केला. लोकमतासाठी स्वतः च्या पत्नीलाही सोडायला ते तयार झाले. त्यांना आपल्या विरोधात बोलतात म्हणून धर्मद्रोही-राष्ट्रद्रोही, नीच घोषित करून स्वतःच्या राज्याबाहेर हाकलून दिले नाही. ते माझ्या पत्नीबद्दल वाईट बोलतात म्हणून त्यांच्या पत्नीबद्दल किंवा माता-भगिणींबद्दल अतिशय विक्षिप्त शब्दात श्रीरामांनी त्यांची निंदा केली नाही. माझी पत्नी रावणाने कपटाने पळवून नेली तर मी रावणाची पत्नी पळवून आणतो अशी विचित्र सूडबुद्धी त्यांनी ठेवली नाही. रावणाच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी बिभीषणाला सांगितलं की ’मरणान्तानि वैराणी’ म्हणजेच रावण आता मेलाय, त्याच्या मरणासोबतच माझं वैरसुद्धा संपलं आहे. आता तो तुझा जसा भाऊ आहे तसाच माझाही भाऊ आहे. आता तू पूर्ण सन्मानाने त्याची उत्तरक्रिया पार पाड. अशा मरणानंतर शत्रूंचाही सन्मान करणार्‍या श्रीरामांचे तथाकथित भक्त आपल्या मरण पावलेल्या विरोधकांच्या आई-बहिणींना शिव्या घालण्यात धन्यता मानताना दिसतात. स्वतः च्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी 14 वर्षांच्या वनवासाला जायला लावणार्‍या कैकयी ला श्रीराम शिव्या देत बसले नाहीत, तिची आलोचना केली नाही तर आपल्या सावत्र मातेचा, एका स्त्रीचा पूर्ण सन्मान ठेवून राज्याभिषेक सोडून वनवासात गेले. मग अशा मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या प्रतिमेचा वापर पदोपदी माणुसकीची मर्यादा ओलांडणार्‍या लोकांनी करावा यापेक्षा दुर्दैव ते काय? आज जर श्रीराम असते तर त्यांनी स्वतः च्या प्रतिमेचा असा गैरवापर करणार्‍यांना काय शिक्षा केली असती? हासुद्धा विचार केला पाहीजे.

सद्यस्थितीत या देशात मोदींना किंवा भाजपला विरोध म्हणजे श्रीरामांना-देशाला विरोध ही भाजप समर्थकांनी काढलेली नवीन व्याख्या संपूर्ण देशवासीयांवर थोपवली जातेय. ही व्याख्या म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार विरोधी मत प्रदर्शित करण्याचा अधिकार हिसकावून घेण्याचे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. मोदींना विरोध करणारा प्रत्येकजण काँग्रेस किंवा विरोधी पक्षांचाच असेल काय? तो कुठल्याच पक्ष-संघटनेशी संबंध नसलेला सामान्य नागरिक असू शकत नाही काय? बेरोजगारीने परेशान असेलला, महागाईने हैराण झालेला सामान्य माणूस निमूटपणे का सर्व सहन करेल? एक सामान्य माणूस श्रीरामांना मानतो, भगव्याला मानतो पण त्याला 105 रुपयांनी पेट्रोल घ्यावं लागतंय, 150 रुपयांनी खाण्याचं तेल घ्यावं लागतंय, 1000 रुपयात गॅस सिलेंडर घ्यावं लागतंय, त्याच्या बँक व्यवहारांवर दंड आकारला जातोय, त्याचा रोजगार जातोय आणि महागाई वाढतेय, त्याच आर्थिक बजेट कोलमडतंय तरी त्याने बोलू नये? प्रत्येक नागरिकाला सरकारची विचारधारा, त्यांचे कार्य पटलेच पाहिजे अशी जबरदस्ती का? तुम्ही कोण जबरदस्ती करणारे? आम्ही देशभक्त आहोत किंवा नाही, आम्ही रामभक्त आहोत किंवा नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? जे भाजप मध्ये नाहीत ते लोक सुद्धा हिंदू आहेतच की, तेसुद्धा रामभक्त आहेतच की. स्वातंत्र्यलढ्यात जे क्रांतिकारक -स्वातंत्र्यसेनानी लढले, ज्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले ते तर या कट्टरवादी विचारधारेचे नव्हते मग ते हिंदू किंवा देशभक्त नव्हते काय? श्रीराम हे काही कोणत्याही पक्षाचे कॉपीराईट आहे काय? या सरकारच कुठे चुकतंय असं कुणाला वाटत असेल तर तो धर्मद्रोही-देशद्रोही झाला काय?

श्रीराम आणि देवीदेवता हे आपल्या हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहेत असे हे कट्टरवादी म्हणतात आणि त्यांच्याच प्रतीकामागून विरोधकांवर व स्त्रियांवर अतिशय अश्लाघ्य भाषेत हल्ला चढवतात. श्रीरामांच्या नावाने देशात धार्मिक द्वेष पसरविला जातो. ह्या गोष्टी आपल्या हिंदू संस्कृतीचा-हिंदू धर्माचा अपमान करणार्‍या नाहीत काय? हिंदू धर्म हेच शिकवतो काय? अशा आपल्या वागणुकीमुळे आपण इतर धर्मियांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल, श्रीरामांबद्दल प्रचंड द्वेषाची पेरणी करतोय हेसुद्धा आपल्याला कळत नाही काय? हिंदू धर्म व श्रीरामांना सर्वोच्च स्थानी मानणार्‍यांनो एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या राजकीय पक्षाकरिता आपण श्रीरामांना आणि हिंदू धर्माला का कायमच बदनाम करत आहोत असा प्रश्न तुम्हाला पडत नाही काय?

आज सोशल मीडियात कुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्यावर जर श्रीरामांचा किंवा भगवा झेंड्याचा प्रोफाइल फोटो असला तर ती व्यक्ती नकोशी वाटायला लागली आहे. अशी प्रतीके वापरणार्‍यांनी ज्या प्रतिकांबद्दल जगातल्या प्रत्येक नागरिकाला आदर आणि सन्मान वाटायला पाहिजे त्या प्रतिकांबद्दल आपण आपल्या वागणुकीतून जगभरात घृणा, दहशद आणि भीती निर्माण करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. जी प्रतिके-प्रतिमा प्रेमाचं-समानतेचं प्रतिनिधीत्व करतात ती प्रतिके व्देष पेरण्यासाठी, समाज फोडण्याकरिता वापरली जाताहेत यापेक्षा दुर्दैव ते काय?

– चंद्रकांत झटाले, अकोला