धक्कादायक: चांदणी चौकात अंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या चुलत्याने केला जावयावर गोळीबार

0
470

हिंजवडी, दि. ९ (पीसीबी) – पुतणीसोबत अंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या चुलता, भाऊ आणि त्यांच्या मित्रांनी मिळून जावयावर तब्बल पाच गोळ्या झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कदायक घटना बुधवारी (दि.८) रात्री सातच्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली.

तुषार प्रकाश पिसाळ (वय २०, रा. राजेगाव, ता. भोर) असे जखमी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे (सर्व रा. राजेगाव, ता. भोर), सागर पालवे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या चौघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तुषार आणि विद्या या दोघांनी काही दिवसांपूर्वीच आंतरजातीय विवाह केला होता. याचा राग विद्याच्या घरच्यांच्या मनात होता. या रागातून मित्रांसोबत लग्नाहून परतणाऱ्या तुषार याला विद्याचे चुलते राजू तावरे, भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी बुधवारी रात्री सातच्या सुमारास चांदणी चौकात आडवले. आणि राजू तावरे याने तुषारवर पाच गोळ्या झाडल्या. यामुळे तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तुषार याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. हिंजवडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.