घड्याळाचे बटन दाबले, तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिले – शरद पवार

0
572

सातारा, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर चिंता व्यक्त केली आहे. मला मशीनवर  बटन दाबायला सांगितले. मी घड्याळाचे बटन दाबले, तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे, असे  पवार यांनी सांगितले.

पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत  बोलत होते.

पवार म्हणाले की, मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटत आहे. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि  बटन दाबायला सांगितले. मी घड्याळाचे बटन दाबले, तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे, असे  पवार यांनी सांगितले.

सर्वच  मशीनमध्ये असे असेल,  असे मी म्हणत नाही,  मात्र मी हे पाहिलेले आहे म्हणून मी काळजी व्यक्त केली, असेही पवार म्हणाले.  आम्ही ५० व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या. त्या चिठ्ठ्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या देखील होत्या, असे पवार यांनी सांगितले.