धक्कादायक; चहा घेऊन जात असताना तरूणावर हल्ला करून जखमी

0
670

लोणावळा, दि.१८ (पीसीबी) – ब्लू डार्ट कंपनीत चहा घेऊन जात असताना किरकोळ वादातून धारदार शस्त्राने सपासप वार करून तरूणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी तळेगाव येथील सोमाटणे फाटा रस्त्यावर घडली आहे.

रोहन दिनकर गराडे (वय १९,रा.धामणे) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रोहन आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रोहन आणि त्याचा मित्र  आदित्य त्यांच्या दुचाकीवरून ब्लू डार्ट कंपनीत चहा घेऊन जात होते. ते परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा आढ्याजवळ वसंत पापळ यांच्या फ्लॅटिंगजवळ आले असता. तीन आरोपींनी मोटारसायकल वरून त्या तरूणांना गाठले नंतर आरोपी प्रसाद याने लोखंडी कोयत्याने रोहनच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. त्यानंतर केतन पोकळे याने कोयता घेतला आणि त्याने देखील रोहनवर वार केले. त्यात रोहन गंभीर जखमी झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच  तत्काळ धाव घेत शिरगाव पोलिस चौकीत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोमवारी रात्री या प्रकरणातील चार आरोपी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुधिवरे खिंड परिसरातील जंगलात लपून बसले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांना मिळाली, नंतर पोलिसांनी घनदाट जंगलात शोधमोहीम सुरू केली.  पोलिसांची चाहूल लागताच  आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांना त्यांचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता  त्यांनी रोहन गराडे याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. प्रसाद उर्फ परशा सुनील टेभेकर (वय२२, रा.उर्से), आकाश श्रीरंग साळुखे (वय२३,रा. सोमाटणे फाटा), हर्षल प्रकाश भोकरे,(वय २२, रा.शिवणे), अनु उर्फ अनुराधा दिलीप काळे (वय २१, रा.तळेगाव दाभाडे), केतन दत्तात्रय पोकळे (वय २२, रा.सोमाटणे फाटा) ,असे या शिरगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे करीत आहेत.