दोन वर्षांपासून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस चिंचवडमधून अटक

0
2458

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – देहुरोड पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, घातक हत्यार बाळगणे या प्रकरणी २०१६ पासून गुन्हा दाखल असलेल्या एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांप्रकरणी तो २०१६ पासून फरार होता. ही कारवाई गुन्हे शाखेकडील खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि.१९) रोजी केली.

महावीर प्रविण लुनावत (वय २२, रा, गोखले आळी शेजारी, मोरया पार्क २, फ्लॅट नंबर ६, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेकडील खंडणी आणि दरोडा विरोधी पथक सोमवारी गस्तीवर असताना पोलीस नाईक आशिष बोटके आणि शैलेश सुर्वे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, देहुरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी महावीर लुनावत हा चिंचवड येथील भाजी मंडईजवळ थांबलेला आहे. यावर पोलिस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून महावीर याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी महावीर बाबत देहुरोड पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड तपासले असता २०१६ मध्ये त्याच्या विरोधात चोरी, दरोडा, घातक हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावर खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने महावीरला देहुरोड पोलिसांकडे सुपूर्द केले.

ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे तसेच पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोख दुधवणे, महेश खांडे, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, उमेश पुलगम, शरिफ मुलाणी, किरण खेडकर, निशांत काळे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, गणेश कोकणे, आशिष बनकर, प्रविण माने, गणेश हजारे आणि नितीन खेसे यांच्या पथकाने केली.