देशातील माध्यमे मोदींनी विकत घेतली – प्रणिती शिंदे

0
529

पंढरपूर, दि. २२ (पीसीबी) – देशातील  सर्व माध्यमे  पंतप्रधान  मोदी यांनी विकत घेतली असल्याने ती मोदी  धार्जिणी झाली आहेत.  त्यामुळे सत्य जनतेसमोर येत नाही, असे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. पंढरपूर तालुक्यातील कोपरा सभेत त्यांनी माध्यमांवर टीका केली. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना   उमेदवारी  जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे  पंढरपुरात  आल्या होत्या.  या वेळी कासेगाव येथील एका कोपरा सभेत त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला.

शिंदे म्हणाल्या, की  देशातील सर्व माध्यमे ही मोदी धार्जिणी झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना विकत घेतले आहे. त्यामुळे सत्य जगासमोर येत नाही. गेल्या निवडणुकीत मोदींनी असाच ‘समाज माध्यमा’चा वापर केला होता. त्या माध्यमांतून त्यांनी  खोटी आश्वासने दिली होती.  मात्र, ती पूर्ण करण्यात आलेली नाहीत.