देवेंद्र फडणवीसांना आम्हीच राजकारणात आणले–नितीन गडकरी

0
509

नागपूर, दि.८ (पीसीबी) – राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अनेकजण समाजाच्या विकासाच्या गोष्टी करतात. मात्र, एकदा निवडून आले की बहुतेकजण समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरु होते. परंतु मी आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील राजकारणात होते. मात्र, त्यांनी मुलाला राजकारणात आणले नाही. तर आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करुन देवेंद्र यांना राजकारणात आणले, असेही ते म्हणाले.  
नागपुरात  गोर बंजारा यांचा  मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, घराणेशाहीपासून मी आणि मुख्यमंत्री दूर आहोत. कारण त्यांची मुलगी लहान आहे. आणि माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात येण्यास इच्छुक नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांच्या नेतृत्त्वात मी काम केले आहे. त्यांच्या आई-वडिलांनी मला सांगितले नव्हते की माझ्या मुलाला तिकीट द्या. त्यांच्या घरी मी आणि छोटू भय्या नारकर  दोघे मिळून गेलो होतो. वडील आजारी होते. मी त्यांना सांगितले की देवेंद्रला राजकारणात पाठवा. आम्हाला त्यांना महापालिकेचे तिकीट द्यायचे आहे.

यावर ते म्हणाले की,  मला काही अडचण नाही, पण त्यांच्या आईला आणि  देवेंद्रला विचारा. त्यांची तयारी असेल तर त्यांनी राजकारणात जावे.  त्यामुळे देवेंद्र यांचे वडील आमदार होते. म्हणून त्यांना तिकीट मिळाले नाही. तर जनता, कार्यकर्ते आणि पक्ष त्यांच्या घरी गेले आणि देवेंद्र यांना राजकारणात आणले, असे ते म्हणाले.