दुष्काळावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दौरे करा; मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना आदेश   

0
600

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा  राज्य मंत्रिमंडळाने आज (शुक्रवार)  झालेल्या   बैठकीत घेतला.  दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी यासंदर्भातील उपाययोजनांना गती देण्यासाठी  पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याचा  आढावा  घेण्यासाठी दौरे करावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सध्याच्या घडीला राज्यात १२ हजार ११६ गावांमध्ये  ४ हजार ७७४  टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१६ मध्ये दुष्काळी परिस्थितीत ९ हजार ५७९  गावांमध्ये ४ हजार ६४० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा  केला होता.  यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष२०१८ च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करुन अद्ययावत नियोजन करण्यात येणार आहे. मॉन्सूनचे राज्यातील आगमन लांबल्यास त्यासंदर्भातील उपाययोजनांची तयारीही राज्य सरकारने केली आहे.

राज्यात सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद विभागात सुरु आहेत. जायकवाडी धरणामध्ये पुरेशा प्रमाणात मृतसाठा असून या विभागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी १ हजार २६४  ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये ७ लाख ४४ हजार मोठी आणि एक लाखांहून अधिक लहान अशी एकूण सुमारे साडे आठ लाख जनावरे आहेत.