मोदींविरोधात न लढण्यासाठी भाजपकडून ५० कोटींची ऑफर; तेजबहादूर यादवांचा गौप्यस्फोट

0
776

वाराणसी, दि. २ (पीसीबी) – वाराणसीतून पंतप्रधान मोदीविरोधात निवडणूक लढवणारे आणि अचानक उमेदवारी रद्द झालेले तेजबहादूर यादव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींविरोधात न लढण्यासाठी भाजपने मला ५० कोटी रूपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट  तेजबहादूर यादव यांनी केला आहे.

माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे आहे. याबाबत  मी निवडणूक आयोगाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे,असेही  यादव यांनी म्हटले आहे. आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे योग्य कागदपत्रे सादर केली होती. मी बीएसएफमध्ये असताना जे चुकीचे वाटले, त्याविरोधात आवाज उठवला. न्याय मिळावा यासाठी माझा आवाज अजून बुलंद करण्यासाठी मी  वारणसीला  येण्याचा निर्णय घेतला.  जर माझ्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी होत्या,  तर मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला तेव्हाच का नाही सांगितले, असे यादव म्हणाले.

दरम्यान, तेज बहादूर यादव यांनी २४ एप्रिल रोजी अपक्ष आणि २९ एप्रिल रोजी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही उमेदवारी अर्जात तेज बहादूर यांनी बीएसएफमधून निलंबित होण्याची वेगवेगळी कारणे नमूद केली आहेत. या कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.