पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार

0
717

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात २९.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला काटकसर करून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि. ६) शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

सध्या ज्या पध्दतीने पाणीपुरवठा सुरू आहे. त्या पध्दतीने पाणीपुरवठा सुरू ठेवल्यास पवना धरणातील पाणी ३० जूनपर्यंतच पुरणार आहे. मात्र, उपलब्ध पाणी ३० जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाणी कपात करणे गरजेचे आहे. यासाठी शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि त्याचे वितरण लक्षात घेता  नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अनावश्यक ठिकाणी पाण्याचा वापर करू नये, घरातील पाणी गळती बंद करावी,    तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील गळत्यांविषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.